डावखुऱ्यांचं जग – स्वात्मसुखाय

काही मनातलं….

#_डावखुऱ्यांचं जग!!

१३ ऑगस्ट, आज जागतिक डावखुऱ्यांचा दिवस!! खरंच गंमत आहे नाही? असा एखाद्या गोष्टीचा जे खरं तर व्यंग्य नाहीच पण तरीही व्यंग्य ठरलेल्या गोष्टीला जागतिक स्तरावर मान्यता मिळवायला खूप काळ जावा लागला!!!

विशेषत: आपल्या संस्कृतीत उजव्या हाताला इतकं महत्व आहे, म्हणजे तो राजकारणातला म्हणत नाहीये हां मी!!! ??

मला म्हणायचंय ते उजव्या हातानेच प्रत्येक चांगली गोष्ट करायची, उजव्याच पायाने शुभकार्याची सुरूवात करायची, असं अगदी घट्ट आत रूजलेले पण बुरसटलेले विचार!! आणि लहान मुलालाही शिकवलं जातं ते म्हणजे #उजवा हात खाऊचा, आणि #डावा हात ‘शी’ चा!! किती तो वेडेपणा!! उजखुरं असणं नाॅर्मल!! आणि डावखुरं असणं, ऍबनाॅर्मल??? कसं काय बरं?? खरं एकाच शरीराचे दोन हात!! दोन्ही हातांचा वापर त्याच्या- त्याच्या क्षमतेनुसार केला जायला हवा!!

आज मला आठवतंय ते मी ‘स्त्री’ मासिकासाठी #डावखुऱ्यांचं #जग ह्या विषयासाठीच घेतलेल्या जवळजवळ ५० डावखुऱ्यांच्या मुलाखती!!! काही प्रत्यक्ष तर काही फोनवर घेतलेल्या!!! खरं सांगते एका डोळ्यांत आनंदाश्रू, तर एका डोळ्यांत दु:खाश्रू उभे राहिले होते!! आनंदाश्रू होते ते, डावखुरे असूनही कसलीही बळजबरी न करता त्यांचा आहे तसा केला गेलेला स्वीकार!!! तर दु:खाश्रू मात्र होते ते डावखुरेपणाची घरच्यांनाच वाटणारी लाज, सातत्याने त्यांना उजखुरं होण्यासाठी दिला गेलेला शारीरिक, मानसिक ताण, त्रास, छळ!!

एका काकांचा अनुभव आजही जसाच्या तसा आठवतोय, ते म्हणाले होते,” मी उजखुरा नाही, म्हणून मला अगदी वाळीत टाकल्यासारखं वागवलं जायचं, आई सटासट मारायची डावा हात पुढे आला की!!आत्तापर्यंत न्यूनगंडाने घेरलेलाच होतो मी!! खरं सांगू आज मला कोणीतरी मानाने वागवतंय असं वाटलं, तुमच्या आपुलकीने!! आज मी जगायला लायक आहे, असा आत्मविश्वास निर्माण झालाय माझ्यात!!!” खरं सांगते, मला कृतकृत्य झाल्यासारखं तर वाटलंच, पण मी तासाभर काकांशी बोलल्यानंतर फोन ठेवताच खूप रडले!!
आता हे #डावखुरं आणि #उजखुरं हे प्रकरण काय आहे?

खरं तर ह्या विषयावर शाळेतच आपण शिकलेलो असतो, जसं की #मुलगा-मुलगी होणं हे स्त्रीवर ठरत नसून फक्त आणि फक्त पुरूषावर ठरतं!!! हा इथे विषय नाही पण तेवढ्याच कानपिचक्या द्याव्याशा वाटल्या इतकंच!!

तर खरं म्हणजे उजखुरं म्हणजे सर्वसाधारण, नाॅर्मल आणि डावखुरं म्हणजे वेगळं/ ऍबनाॅर्मल असं अजिबातच नाही!!

आपल्या मोठ्या मेंदूचे दोन भाग असतात, एक असतो उजवा गोलार्ध आणि दुसरा डावा गोलार्ध!! किमया अशी की त्या परमात्म्याची, की, जिथे तिथे तो सगळ्यांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न करतो!! म्हणजे उजव्या गोलार्धातील चेतापेशी, शरीराच्या संपूर्ण डाव्या भागाचं नियंत्रण करत असतात, तर बरोबर उलटं, म्हणजे डाव्या गोलार्धातील चेतापेशी शरीराच्या संपूर्ण उजव्या भागाचं नियंत्रण करत असतात!! आणि त्यामुळे ज्या व्यक्तीचा डावा गोलार्ध जास्त कार्यक्षम असतो तो माणूस अर्थातच असतो, #उजखुरा!!! तर ज्याचा उजवा गोलार्ध जास्त कार्यक्षम तो असतो #डावखुरा!! कित्ती छान, सोप्पं आहे!! आणि पुन्हा गंमत आहे, उजवा गोलार्धच आहे जास्त कार्यक्षम?? म्हणजे कुठेतरी उजवेपण आहेच ना त्या डावखुऱ्या व्यक्तीत?? मग तो जर डाव्या हाताने जेवत असला आणि शी त्याने उजव्या हाताने धुतली तर बिघडतंय कुठे?? कशाला आटापिटा त्याचं वेगळेपण संपवण्याचा? खरं तर डावखुरेपणाची काही वैशिष्ट्ये आहेत,ती व्यक्ती सर्जन बनण्यास अत्युत्तम, तशीच मनमोकळी, दिलदार!! तर उत्तम वादन,गायन,चित्रकला, अभिनय इ. खरं तर ६४ कला अशांना छान अवगत असू शकतात!! (बाप्पा पण डावखुरा होता का हो?) मज्जा हं!! अभिनयाचा अनभिषिक्त शहनशहा “अमिताभ” हा डावखुरेपणाचं मोठ्ठं उदाहरण!!!

अशाच पुण्यातल्या श्री. बिपिनचंद्र चौगुले ह्यांचंही ह्याचसाठी खूप खूप कौतुक, आणि आभार!! कारण अशा “वेड्या” माणसांची त्यांनी छानशी संस्थाच काढलीय!! #Association of Left Hander’s’, ह्या नावाने!! त्याचे ते Founder!! मला खूप अभिमान वाटला, त्यांच्याशी बोलता आलं, गप्पा मारता आल्या, आणि चक्क मग मला बालचित्रवाणीवरच्या छोटुशा नाटुकलीत त्यांनी अभिनय करायची संधीही दिली त्याचा!!

असो, इथे तो विषय नको!! पण हल्ली एवढं डावखुऱ्यांना वाईट वागवल्याच्या घटना ऐकल्या नाहीयेत!! विचार बदलले आहेत!! एखादी बाई जेव्हा डाव्या हाताने कुंकू लावते, तेव्हा तिने ते उजव्या हाताने लावावं असा हट्ट कोणीही धरत नाही!! अर्थात हल्ली कुंकूच लावणं मागे पडलंय, असो!!

पण ह्या बदलामुळे मला #डावखुऱ्यांना खऱ्या अर्थाने #स्वातंत्र्य मिळालंय असं वाटतंय!!

आणखी एक गंमत!! मला लहानपणी हातांना खूप तापामुळे सालं निघाल्याने खूप त्रास होत होता, त्यात उजवा हात बरा व्हायला खूपच वेळ गेला, मग आधी आप्पा भरवत, पण किती वेळा ते काय काय करणार, मग मी डाव्या हाताने लिहिण्याची, जेवण्याची आणि माझ्या काही कामांची सवयच करून टाकली, आजही मी छानपैकी डाव्या हातानेही चमचा ढवळू शकते, ??? महणजे स्वयंपाकात किंवा खास लाडू वगैरे बनवताना उजवा हात पीठ भाजताना दमला की डाव्या हाताला मस्तपैकी कामाला लावते!! शहाणा माझा बाबा तो, एकदम झक्कास काम करतो!!
म्हणजे मी पण डावखुरीच आहे का??? मी जरा नकी बघते, तोपर्यंत तुम्ही पण करा विचार!! आणि हो डावखुऱ्यांना प्रेमळ, दिलखुलास शुभेच्छा तेवढ्या द्यायला विसरू नका हं!!!

….स्वात्मसुखाय…..
(स्वाती रानडे गानू)

You missed

YouTube
YouTube
LinkedIn
LinkedIn
Share
Instagram
WhatsApp